WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाळूचा ट्रक उलटल्याने तीन मजूर ठार; पाच गंभीर जखमी;

Image

रात्रभर जागले गोधनीवासी; गावातील चुलीही पेटल्या नाहीत

सतीश बाळबुधे : गोधनी हे गाव यवतमाळ शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करून पोट भरणे हा येथील ग्रामस्थांचा नित्यक्रम. वाळू भरण्यासाठी निघालेला ट्रक घाटंजी तालुक्यात तळणी ते कोळी मार्गावर उलटला. या अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला तर, पाच तरुण जखमी झाले आहेत.

Image

तिघेही कुटुंबातील कर्तेतरुण असल्याने एकाच क्षणात तीनही कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. गोधनीत एकाच दिवशी तीन अंत्ययात्रा निघाल्याने ग्रामस्थांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. आकाश दाभेकर, जगदीश उर्फ वैभव मसराम, किसन ठाकरे यांच्या पालकांसह आप्तस्वकीयांनी मृतदेह बघताच केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय हेलावणारा होता.

हातावर आणणे आणि पानावर खाणे हा त्यांच्या जीवनाचा भागच. कधी उपाशी, तर कधी पोटात दोन घास, हे आयुष्याचं समीकरण. रात्री वाळू आणण्यासाठी जात असताना घात झाला. तो प्रवास त्यांचा अखेरचा ठरला. अपघाताचे वृत्त कळताच अख्खे गाव एकाच ठिकाणी एकवटले. जखमींच्या मदतीसाठी काही ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. उपचारासाठी आर्थिक मदत केली. गावातही नागरिकांनी शेकोट्या पेटवून रात्र जागून काढली. सकाळी एकाही घरापुढे सडा, सारवान करण्यात आले नाही. गावावर आभाळा एवढं डोंगर कोसळल्याने चूलही पेटली नाहीत. अंत्यसंस्काराच्या वेळी गावातील वातावरण अधिकच भावुक झाले होते.

वर्गणीसाठी मदतीचा हात

तिघाही तरुणांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबांकडे पैसा नव्हता. वर्गणीसाठी सरपंच सुभाष तोडसाम, पोलिस पाटील मंगेश मानकर, राजू पजगाडे, अरुण भिसे, राजू मानकर, देवीदास मानकर, अजय प्रजापती, हरिभाऊ भोयर, शंकर भिसे, जीवदास मेश्राम यांच्यासह नागरिकांनी आपला वाटा उचलला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share